फिक्के पडले रंग..
काल होळी होऊन गेली. ऑफीसला सुट्टी नसल्याने रंग खेळता नाही आले. रंगपंचमी १५ ला आहे, रविवारी पण काय उपयोग म्हणा सुट्टी असुनही, रंग खेळायला मित्र-मैत्रिणी हवेत ना. काळाच्या ओघात सगळे हरवलेत.
लहानपणी काय दिवस होते ते. सकाळ पासुन जो रंगांचा खेळ सुरु व्हायचा! कित्तेक प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, फुगे रंगाचे, पाण्याचे आणि हवा+पाण्याचे ही. सोसायटीमध्ये नुसता गोंधळ, ओरडा-आरडा असायचा. कुणाचे - 'अरे मी तिला रंग लावला' तर कुणाचे 'मी फेकलेला फुगा तिच्या 'टिंब टिंब' वर आपटला काय भन्नाट मज्जा असायची. त्यातच 'ए सिल्व्हर नाही लावायचा हा'. 'प्लिज रे डोक्यात नको रंग टाकुस' चालुच असायचे. दुपारपर्यंत खेळल्यावर गाड्यांवरुन गावभर चक्कर.. स्वतःचे रंग मिरवत फिरणे.
मग दुपारी घरी येउन घासुन घासुन रंग घालवण्याचा प्रयत्न. साबण, बादल्या, बाथरुम सगळ रंगुन जायचे आणि तरीही चेहऱ्यावर अंगावर रंग रहायचाच. मग मस्त मम्मीने बनवलेल्या पाकातल्या पुऱ्या खाउन ताणुन द्यायची.
संध्याकाळी मित्रांबरोबर चकाट्या पिटतानाच कुणाचा किती रंग गेला आणि किती राहीला याची चर्चा!
हम्म.. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी आणि उरले ते फिक्के पडलेले रंग :(